पळवे : नगर-पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढल्याने गतिरोधक निर्मितीचे काम सुरू आहे. वर्षभरात पळवे (ता. पारनेर) परिसरातच वेगवेगळ्या वाहनांचे लहान-मोठे २८ अपघात झाले आहेत.
नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा ते जातेगाव फाटा दरम्यान आतापर्यंत या वर्षी नोंदणीकृत १३ जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या १५ अपघातात अणेक जण जखमी झाले आहेत. या परिसरात नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे. यात शेतकरी, विद्यार्थी यांची संख्या आहे. म्हसणे फाटानजीकच महाविद्यालय तसेच नवीन औद्योगिक वसाहतीमुळे पादचारी, दुचाकीस्वार यांची वर्दळ वाढली आहे. महामार्गावरून जाणारी अनेक वाहने वेगात असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामरगावच्या आसपास वाहतूक नियंत्रणची व्यवस्था आहे. मात्र, मागील आठवड्यात पळवे येथील साईडपट्टीवरून चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा कारच्या अपघातात मृत्यू झाला. अशा अपघातांनी अनेक निष्पापांचा बळी घेतला आहे.
त्यामुळे महामार्ग व्यवस्थापकांकडे श्री समर्थ शिक्षण संकुलाचे अध्यक्ष कैलास गाहीलकर यांच्यासह पळवे ग्रामस्थ यांनी गतिरोधक वाढविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत म्हसणे फाटा टोलनाका व्यवस्थापकांनी तत्काळ वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक बसविण्याचे काम सुरू केले. यामध्ये कमी उंचीचे दाट व्हाईटपट्टे, सोलर लाईट अशा प्रकारचे काम सुरू केल्याची माहिती अभियंता सचित भडके यांनी दिली.
....
वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे म्हसणे फाटा चौकात वाहनांची तसेच नागरिकांची ये-जा असते. कंपन्यांकडून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे याही ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
-कैलास गाडीलकर
अध्यक्ष, श्री समर्थ अकॅडमी
फोटो ओळ ३१ पळवे रोड
नगर-पुणे महामार्गावर पळवे परिसरात गतिरोधक तयार करताना कर्मचारी.