संगमनेर : युवकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न उध्वस्त करणारा सर्व विभागातील कंत्राटी कारणाचा शासन निर्णय मागे घ्यावा. राज्यातील ६५ हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करा. जिल्हा परिषदेच्या १५ हजार शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना रद्द करा. जीडीपीच्या १० टक्के शिक्षणावर खर्च करा. या मागण्यांसाठी शनिवारी ( दि.२१) संगमनेरातील यशवंतराव प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी पालक शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी आमदार डॉ. सुधीर, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत आदी सहभागी होऊन मार्गदर्शन करत आहेत. शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटी प्रक्रियेला समाजातून मोठा विरोध होत असून हा जुलमी निर्णय थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. असे मोर्चेकर्यांनी सांगितले. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून निघालेला मोर्चा नाशिक-पुणे महामार्गावरून यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनावर नेण्यात आला.
जीडीपीच्या १० टक्के शिक्षणावर खर्च करा; संगमनेरात यशवंतराव प्रशासकीय भवनावर मोर्चा
By शेखर पानसरे | Published: October 21, 2023 2:11 PM