भज गोविंदम-१०
का ते कांता कस्ते पुत्र:, संसारो यमतीव विचित्र: कास्य त्वं क: कुत आयात: तत्वं चिन्तय तदिह भ्राते- १०
कोण तुझी पत्नी ? कोण तुझा मुलगा? तू कोणाचा आहेस? तू कोण आहेस, ? तू कोठून आलास ? हा संसार अतिशय विचित्र आहे. हे बंधो ! यामधील सत्याचा विचार कर. तोही येथेच कर ...
मानव हा समूहप्रिय प्राणी आहे. यातूनच कुटुंब संस्था उदयाला आली आहे. एका दृष्टीने ते चांगले आहे. कारण मानव हा काही इतर पशुप्रमाणे नाही. त्याला बुद्धी आहे. वाणी आहे. चांगल्या वाईटाचा निर्णय करता येतो. नीती नियमाचे पालनही करता येते. माता-पिता बंधू-बहिण यातील ममत्त्व, नीती संबंध हे सर्व त्याला कळतात. त्याप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो.
या नात्यागोत्यामध्ये खरे हित कोणी सांगणारा आहे का ? फक्त आसक्ती असते ? हेही समजले पाहिजे. हे सर्व नाते नि:संशय पवित्र असतात यात शंका नाही. पण आपल्याला मनुष्य जन्म कशाकरीता मिळाला हे समजले पाहिजे. ‘नरादेहाचेनी ज्ञाने, सद्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावालोकाने दिधला (नामदेव महाराज) मानवी देह मोक्षाकारीता मिळाला आहे. पण संसारात, नात्या-गोत्यात आसक्त होऊन मनुष्यजन्माचे खरे कर्तव्यच विसरून गेला. त्यास वैराग्य व्हावे म्हणून भगवदपुज्यपाद आद्य श्री. शंकराचार्य स्वामी त्या जीवाला सांगतात की, अरे ! तू ज्या संसारात माझे, माझे म्हणून रमातोस, तो संसार तुझा आहे का ? त्यामधील तुझी बायको शेवटपर्यंत तुझी साथ देणार आहे का ? विवाह संबंधाने तुम्ही एकत्र आला आहात. लग्नापूर्वी तुम्ही एकत्र होता काय ? तर नाही आणि दोघांपैकी कोणीतरी अगोदर हे जग सोडून जाणार आहे. त्यानंतर तुमचा संबंध असणार आहे का ? तर नाही. थोडक्यात संसार म्हणजे मानवाचे परीक्षास्थळ आहे. संयमाने आणि अनासक्तीने प्रपंच सुद्धा मुक्तीला कारण होऊ शकतो. पण तो अलिप्तपणे करता आला पाहिजे.
जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज म्हणतात,
जाणोनी नेणते करी माझे मन। तुझी प्रेमखूण देवोनिया॥ १॥ मग मी व्यवहारी असेन वर्तत।जेवी जळा आत पद्मपत्र॥२॥ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी। जैसा का उन्मनी योगीराज॥३॥देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी।स्वप्नीचिया सृष्टी चेइल्या जेवी॥४॥तुका म्हणे ऐसे झालीया वाचून। करणे तो शिण वाटतसे
वरील अभंगात सांगितल्याप्रमाणे जर अनासक्त बुद्धीने संसारात राहिले तर मनुष्याचा उद्धार झाल्यावाचून राहत नाही. हे श्री. तुकाराम महाराजांनी उदाहरणासह पटवून दिले आहे आणि श्री शंकराचार्यांना देखील हेच म्हणावयाचे आहे. म्हणून ते सांगतात की, बायको तुझा उद्धार करणार नाही. अपवाद वगळता (चुडाला राणी). पुत्राची व्याख्या करतांना शास्त्र म्हणते पू नामक नरकातून जो तारतो, तो खरा पूत्र असतो. जो आई वडिलांची सेवा कतो, तो खरा पूत्र. पण हे सगळेच असे नसतात. उलट म्हातारपणी आई वडिलांना सोडून जाणारे पुष्कळ, त्यांना वृद्धाश्रामात ठेवणारे जास्त दिसतात.
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकाला रे, प्राण्या माझे माझे म्हणोनीअंतकाळी कोणीच वाचवायला येत नाही. उलट सगळे सोडून जातात. प्रसिद्ध उदाहरण गजेंद्र आहे. शेजीची कमिन दुरी राहे, हे तुकाराम महाराज सांगतात. मानवाने स्वत:ला जाणले पाहिजे हाच खरा परमार्थ आहे. अध्यात्म वेगळे आणि धर्म वेगळा आहे. धर्म नीती नियम, विहित निषिद्ध काय आहे?याची शिकवण देतो, पण अध्यात्म मात्र ‘तू कोण आहेस हे शिकवितो. आत्म्याचे यथार्थ रूप अध्यात्म शिकविते. तू कोठून आलास, तुला कोठे जायचे आहे? हे अध्यात्म शिकविते. म्हणून हे बंधो ! तू सार-असार याचा विचार कर, खरे काय खोटे काय याचा विचार कर. तोही या इहलोकीच आणि येथेच व आत्ता कर. तरच काही तरणोपाय होईल, अन्यथा अवघड आहे. असे स्वामी विवेकानंद म्हणतात. स्वत:ला जाणणं हेच खरे अध्यात्म. -------------------------------------------------------------
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागावाताश्रम, चिचोंडी(पाटील), ता. नगर मोबा.नंबर ९४२२२२०६०३