नेवासा : विकेंड लॉकडाऊनला शनिवारी नेवासा शहरासह ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेवासा शहरासह सोनई, भेंडा, कुकाणा, घोडेगाव, वडाळा या प्रमुख गावांसह नेवासा तालुक्यातील विविध गावांत विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट पहायला मिळाला. तालुक्यात अत्यावश्यक सेवेत असलेले हॉस्पिटल, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. शहरातील बाजारपेठेत सकाळी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व पोलीस हवालदार तुळशीराम गीते यांनी संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन केले. नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता.
तालुक्यात मागील १५ दिवसांपासून दररोज करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांकडून काटेकोर पालन होताना दिसून आले.
व्यापारी बाजारपेठेसह बसस्थानकातून एकही बस न सुटल्याने येथेही शुकशुकाट होता. तालुक्यातील रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा पार केला असून शनिवारी ८६ रुग्णांची नव्याने भर पडली. रुग्णसंख्या ४१५१ इतकी झाली असून नेवासा खुर्द व सोनई येथे प्रत्येकी १४ रुग्ण आढळून आले. भेंडा येथील कोविड केअर सेंटर येथे १७१ रुग्ण उपचार घेत आहेत.
--
१० नेवासा
नेवासा शहरात शनिवारी दुपारी असा शुकशुकाट होता.