शेवगाव : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाबाधितांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी शहरातील निकषात बसणाऱ्या खासगी हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. बिलांसंदर्भात समितीची व रेमडेसिविरचा काळाबाजर रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील बेडके हॉस्पिटल १५ बेड, तर लोकमान्य हॉस्पिटल ३५ बेड यांना कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विखे हॉस्पिटलचा १०० बेडचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी सांगितले. आणखी काही हॉस्पिटलने प्रस्तावासंदर्भात माहिती घेतली असून त्यांचेही प्रस्ताव दाखल होतील, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ७५ बेड क्षमता असलेले कोविड केअर सेंटर सुरू आहे. लवकरच त्रिमूर्ती कॉलेज येथे २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना औषध, जेवण, नाश्ता, अंडी, पाणी आदी सुविधा देण्यात येत आहेत, असे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले. तहसीलदारांनी तालुक्यातील खासगी डॉक्टर, मेडिकल मालकांची सोमवारी तहसील कार्यालयात बैठक बोलावली आहे.
---
तीन हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमध्ये रुग्णांच्या संख्येनुसार ३४ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पथक तयार केले आहे. पथक दररोज जाऊन स्टॉकची तपासणी करणार आहे. बिलासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
- अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव