अहमदनगर : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. हे पथक सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरात फिरून कारवाई करणार आहे. स्वच्छतेबाबत केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला आहे.
शहर व परिसरात आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात येत आहे. अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. महापालिकेची चार प्रभाग समिती कार्यालये आहेत. प्रभाग समिती कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. ही पथके सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरात फिरून ओला व सुका कचरा वेगळा करणे, होम कंपोस्टींग करणे, ॲप डाऊनलोड करण्याबाबतची जनजागृती करणार आहेत. स्वच्छतेची मोहीम सुरू असताना नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे शहरभर फिरून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला आहे. सावेडी प्रभाग समिती कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांसाठी पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, लेखा विभाग, नागापूर उपकार्यालय, संगणक, उद्यान आणि कोर्ट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रभाग समिती कार्यालयातील प्रभागांसाठी बांधकाम, माहिती सुविधा, वाहन, विद्युत, रेकॉर्ड, स्टोअर, नेहरू रोजगार रिव्हिजन, एलबीटी, मार्केट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. झेंडीगेट प्रभाग समितीसाठी आस्थापना, नगररचना, नगरसचिव, मुख्यलेखा परीक्षक, जनगणना, माहिती सुविधा आणि क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. केडगाव प्रभाग समितीसाठी कामगार, प्रसिध्दी, अतिक्रमण, प्रकल्प, केडगाव उपकार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
...
स्वच्छता निरीक्षकांशी समन्वय ठेवून काम करावे
महापालिकेने चार प्रभाग समिती कार्यालयनिहाय स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्वच्छता निरीक्षक प्रभागात फिरून स्वच्छतेचा आढावा घेत असतात. इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्त केलेल्या भागातील स्वच्छता निरीक्षकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.