बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले. गणेश बायकर हा वडाळी येथील शेतकरी दिंगाबर व नंदाबाई बायकर याचा मुलगा आहे. गणेशाचे प्राथमिक शिक्षक वडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात झाले. सध्या तो लोणी काळभोर येथील गणपतराव काळभोर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गणेशला व्यायामाचा विशेष छंद होता. दहावीत असताना दूरचित्रवाहिनीवर वेटलिफ्टींगची स्पर्धा पाहिली आणि गणेश वेटलिफ्टींग खेळाच्या प्रेमात पडला. राज्यपातळीवर त्याने तीन सुवर्णपदके मिळविली आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर यश त्याला हुलकावणी देत होते. पण उज्ज्वला माने यांनी वेटलिफ्टींगचे त्याला चांगले धडे दिले. त्यान राज्यपातळीवर सुवर्णपदक मिळविले आणि खेलो इंडियात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या महिन्यात गणेशला डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एक महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला. पण गणेशने आराम न करता आपले ध्येय गाठण्यासाठी वेटलिफ्टींगचा सराव सुरू ठेवून खेलो इंडियाच्या मैदानात उतरला. स्नॅचमध्ये ११० तर जर्कमध्ये १४० किलो वजन उचलले आणि बाँझपदकावर नाव कोरले. खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पदकाची हॅटट्रिक केली आहे. तर गणेश बायकरने वेटलिफ्टींगमध्ये बाँझपदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडियात श्रीगोंद्याला चौथै पदक मिळाले आहे. गणेशला गेल्या महिन्यात डेंग्यू झाला. आम्ही खेळू नको म्हणत होतो. गणेश खेळला आणि पदक मिळविले. आता गणेशसाठी जमीन विकू. पण माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया गणेशच्या आई, वडिलांनी व्यक्त केली.
मी काय खेळतोय तालुक्यात माहीत नव्हते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करीत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहन दिले. खेलो इंडिया वेटलिफ्टींगमध्ये बाँझपदक मिळाले. आला कॉमन वेल्थ गेम टार्गेट राहणार आहे, असे वेटलिफ्टींग खेळाडू गणेश बायकर यांनी सांगितले.