श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेचा घनकऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सोमवारी साळवणदेवी रोडवरील नगरपालिकेचा कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या दारात कचरा पेटवून दिला़ आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रोड परिसरात घनकचऱ्याचा डेपो आहे. या घनकचऱ्यासोबत मृत झालेली जनावरे ही मोठ्या प्रमाणात टाकली जात असल्याने त्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आढळून येतो. या मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. शहरातील टाकलेला कचरा पेटवून दिल्याने परिसरात धुराचे साम्राज्य वाढत चालले आहे. परिसरात वायू प्रदूषण वाढले आहे.साळवणदेवी रोड परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन देऊन आंदोलन करूनही कचरा डेपो बंद होत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले़ सोमवारी साळवणदेवी रोडवरील नगरपालिकेच्या कचरा डेपोमधून कचऱ्याचा ट्रॅक्टर भरून आणून नगरपालिकेच्या दारात आणून टाकत तो पेटवून दिला. हा प्रकार अचानक घडल्यामुळे परिसरातील नागरिकांसह कर्मचारी आणि अधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. नगरपालिकेचे अग्निशामक वाहनही त्या ठिकाणी पोहचले़ मात्र आंदोलनकर्त्यांनी पेटलेला कचरा विझवू दिला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठे धुराचे लोंढे दिसत होते. सोनाली रायकर, सारिका रायकर, दीपा मेहेत्रे, पल्लवी रायकर, शशीकला वडवकर, जयश्री रायकर, मंदा वडवकर, सुरेखा भोळे, रोहिणी भोळे, कलावती रायकर या रणरागिनींनी आंदोलनात भाग घेतला. ...तर मुख्याधिकाऱ्यांना साडी चोळी !आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना संतापलेल्या रणरागिनींनी बांगड्या घालण्याचा प्रयत्न केला. येत्या २ दिवसात जर तेथील कचरा डेपो हलविला नाहीतर पुढील आंदोलनाच्या वेळी नुसत्या बांगड्या नाही तर साडी चोळी पण भेट देणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली.दोन दिवसात प्रश्न निकाली साळवणदेवी रोड परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्याशी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी चर्चा केली़ पोटे तेथे पोहोचल्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला़ त्यानंतर तुमचे प्रश्न येत्या दोन दिवसात निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष पोटे यांनी दिले़
श्रीगोंदा नगरपालिकेच्या दारातच कचरा पेटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2017 7:00 PM