श्रीरामपूर : तालुक्यातील कारेगाव येथील पाच वर्षे वयाच्या मुलीच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. अत्याचार झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी तपासणीनंतर व्यक्त केला. न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. परिस्तिथीचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. श्रीरामपुरातील साखर कामगार रूग्णालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.कारेगाव येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. गावातील गरीब मागासवर्गीय समाजातील अंगणवाडीत शिकणारी ही मुलगी आहे. तिचे आई व वडील दोघेही मजूरी करतात. शनिवारी सकाळीच दोघेही कामावर गेले होते. आजीसह दोन वर्षे वयाने मोठी असलेल्या आपल्या बहिणीबरोबर मुलगी घरी होती. शौचालयाला बहिणीसोबत बाहेर गेलेली मुलगी घरी परतली असता तिला चक्कर आली. स्थानिक डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला श्रीरामपूरला नेण्यात आले.तेथे प्राथमिक तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. रवींद्र जगधने यांनी वर्तविला आहे. न्यायवैद्यक तापसणीसाठी मृतदेह औरंगाबाद अथवा प्रवरा रुग्णालयात नेण्याचे सुचविले आहे, असे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. मुलीवर अत्याचार झाल्याचा अंदाज आहे. डॉक्टरांशी आपण चर्चा केली आहे, असे असले तरी न्याय वैद्यक अहवालानंतर ते स्पष्ट होईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची वार्ता पसरताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.
श्रीरामपूरात मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ; अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 7:11 PM