राजूर : साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली.अकोले आगाराची बस साम्रद येथे मुक्कामासाठी बुधवारी रात्री आलेली होती. ही गाडी सकाळी साडे सहा वाजता साम्रद येथून निघाली. प्रवासी घेत ही बस द-याची वाडी जवळ आली असता बसचे ब्रेक निकामी झाले तर स्टेअरिंगही लॉक झाले. त्यामुळे मोठा खडखड आवाज होऊन बसचा वेगही वाढला. त्यावेळी बस चालक अशोक इदे यांनी प्रसंगावधान राखत स्टेअरिंगवरील ताबा सोडला नाही. काही वेळातच ही बस चढणीवर एका झाडाला जाऊन धडकली. यात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले.बसमधील संतोष सोडनर व एकनाथ भांगरे यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्ण वाहिका बोलावली. जखमींना घेऊन तातडीने त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक अशोक ईदे व अलका काळु भांगरे या दोन जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बच्चू तुळशिराम पोकळे (वय ३०), पंढरीनाथ भिमा धिंदले (२४), ढवळा देऊ पोकळे (वय ५०), प्रकाश सोमा खडके (वय ४२), निंबा देऊ पोकळे (वय ४५, सर्व रा. शिंगणवाडी), तुकाराम खिलाजी घोगरे (वय ४५, रा. पाचनई), पांडुरंग तुकाराम सोडणर (वय ६०, रा. घाटघर), चंदर उल्हा उघडे (वय ५०) व हिराबाई बाळू उघडे (वय २५, दोघेही रा. पांजरे), कोंडाजी नारायण साळवे (वय ६०, रा. भंडारदरा कॉलनी), वंदना कोडांजी खाडे (वय २२, रा. भंडारदरा), चिंधू कावजी भांगरे (वय ६५ रा. मुरशेत) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. धोत्रे व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी उपचार केले.घटनेचे वृत्त समजताच आमदार वैभव पिचड यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. डॉ. धोत्रे यांच्याशी चर्चा करत धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रुग्णाची काळजी घेण्याबाबत सूचना केली. शिवसेनेचे सतिष भांगरे यांनीही रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली.
एसटीचे बे्रक निकामी, स्टेअरिंगही झाली लॉक; द-याची वाडीमध्ये बसला अपघात, १४ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 4:27 PM