कर्जत : कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.अहमदनगर येथील तारकपूर आगाराची राशिन- अहमदनगर ही बस (एमएच-०६, एस- ८२४२) कोभंळीमार्गे २४ ते ३० प्रवाशी घेऊन नगरच्या दिशेने जात होती. ही कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळ वळण घेत असताना अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
या बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांपैकी २० प्रवाशी जखमी झाले. या अपघाताचा आणि प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील लोकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली व प्रवाशांना बाहेर काढले. कोभंळीचे पोलीस पाटील शरद भापकर यांनी तातडीने रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. या अपघाताची खबर मिळताच मिरजगाव दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सुरेश बाबर, दत्ता कासार घटनास्थळी दाखल झाले. १०८ या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी नगराला हलवण्यात आले तर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना कर्जतमध्येच उपचार करुन सोडण्यात आले. आशा एकनाथ काळे, प्रांजल सुनील चांगण, बबन दिगंबर गवळी, हिरामण तुकाराम गवळी, प्राजक्ता अप्पासाहेब जोगदंड, दिलीप खरात, मंगल शामराव बोडखे, नानासाहेब धोंडिबा कंद यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रल्हाद खरमरे (वय ७५) यांच्यासह इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात आल्यामुळे त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. जखमींमध्ये एसटी बस वाहक साबळे यांचाही समावेश आहे तर चालक उत्तम नामदेव शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत.