श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात सर्वत्र अनलॉक होताच एसटी महामंडळाचे चाकही हळूहळू गतिमान होत आहे. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस व रातराणीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप त्याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
नगरच्या तारकपूर बसस्थानकावरून सध्या तारकपूर-मुंबई, पाथर्डी-मुंबई, शेवगाव-मुंबई व जामखेड-मुंबई या रातराणीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. रात्री आठ वाजेनंतर या गाड्या मुंबईला रवाना होतात. मात्र अद्यापही त्यांना पूर्ण क्षमतेने प्रवासी मिळत नाहीत. काही सीट रिकामे ठेऊनच त्या धावत आहेत.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवासी संख्या उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. लॉकडाऊनपूर्वी रातराणी बसेसना चांगली प्रवासी संख्या मिळत होती. ती स्थिती लवकरच प्राप्त होईल, असा विश्वास महामंडळाचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
--------
रातराणी बस म्हणजे काय?
एसटी महामंडळने रातराणी बसेसची एक व्याख्या निश्चित केलेली आहे. त्यानुसार रात्री आठ वाजेनंतर सुटणारी व सलगपणे पाच तासांपेक्षा जास्त प्रवास करणारी कोणतीही एसटी बस ही रातराणी ठरते.
------
रेल्वेमुळे एसटीला फटका
नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी येथे रेल्वे स्थानकांवरून मुंबईला जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर त्याचा एसटीच्या रातराणी गाड्यांना फटका बसला. रेल्वेगाड्या या एसटी बसपेक्षा आरामदायी आहेत. त्यामध्ये झोपून प्रवास करता येतो व एसटी बसपेक्षा कमी दरात रेल्वे प्रवास होतो. त्यामुळे प्रवाशांचा कल रेल्वेसेवेकडे अधिक असतो. श्रीरामपूर आगाराची रातराणी बस दोन ते अडीच वर्षांपूर्वीच प्रवासी संख्येअभावी बंद झाली.
----------
ट्रॅव्हल्सचे ७०० पर्यंत भाडे
एसटीच्या रातराणीला फारसा प्रतिसाद नसला तरी खासगी ट्रॅव्हल्सला मात्र गर्दी होत आहे. एसी सुविधा असलेल्या ट्रॅव्हल्स ५०० ते ७०० रुपयांमध्ये स्लिपर कोचने मुंबईला पोहोच करतात. व्यापारी व प्रतिष्ठीत व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासालाच पसंती देत असल्याचे दिसते.
-------
जिल्ह्यातील एसटीच्या फेऱ्या
२२७ एसटी बसेसच्या ६१२ फेऱ्या
-----------
रातराणी बसेस ४
-----------
वाहक १२९०
-----------
चालक १३००
----------
मुंबईबरोबरच पुणे, नागपूर, अकोला, जालना येथे रात्रीच्या एसटी बसेस सुरू आहेत. लवकरच एसटी बसेस पूर्ण आसनक्षमतेने धावतील, अशी अपेक्षा आहे.
-चंद्रकांत खेमनर, एसटी महामंडळ कार्यालय, नगर.
---------