शेतकरी कुटुंबात जन्म. लहानपणी सायकलिंगमध्ये करिअर करण्याचा कधीच विचार केला नव्हता. मोठा भाऊ सायकलिंगच्या स्पर्धेत सहभागी व्हायचा. त्याला पाहूनच कृष्णाला सायकलिंगची आवड लागली. तासनतास सराव करू लागला. आठवीत असताना शालेय राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. १९ वर्षीय गटात त्याची नुकतीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील कृष्णा नवनाथ हराळ याचा सायकलिंगचा प्रवास...नगर तालुक्यातील राळेगण म्हसोेबा येथील शेतकरी कुटुंबात कृष्णाचा जन्म झाला. वडील नवनाथ आणि आई उषा यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही माघार घेतली नाही. शिक्षणाबरोबर मुलांनी खेळातही कायम अग्रेसर राहावे असा दोघांचाही सातत्याने आग्रह असायचा. प्रसंगी संसारात ओढाताण झाली तरी मुलांना दोघांनीही काहीही कमी पडू दिले नाही. मोठा मुलगा अजिंक्य शाळेत असताना सायकलिंगच्या विविध स्पर्धेत सहभाग घ्यायचा. दहावीत असताना अजिंक्य राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धा खेळला. अजिंक्यचा खेळ पाहून कृष्णालाही सायकलिंगची आवड जडली. त्यामुळे त्याने सराव करण्यास सुरुवात केली. दररोज २० किलोमीटर सराव पहाटे करायचा. सरावात सातत्य असल्याने २०१४ मध्ये पहिल्यांदा ८ वी मध्ये असताना स्पर्धेत सहभाग घेतला. वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १४ वर्षीय वयोगटात त्याने यश मिळविले. मात्र या गटात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा नसल्यामुळे कृष्णा थोडासा निराश झाला. पुढील वर्षी १७ वर्षीय वयोगटात खेळला. विभागीय पातळीपर्यंत मजल मारता आली. अपयश आल्याने निराश न होता सरावात त्याने सातत्य ठेवले. दहावीत असताना पुन्हा एकदा १७ वर्षीय वयोगटात त्याने धूम ठोकली. सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावले. २०१६ वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धाही सांगली येथेच झाल्या. या स्पर्धेत त्याने पहिल्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. गावात दहावीपर्यंत शिक्षण असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी नगर गाठावे लागले. पेमराज सारडा महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबरच दररोज पहाटे सराव सातत्याने सुरुच होता. डिसेंबर २०१८ मध्ये बारामती येथे १९ वर्षीय शालेय राज्यस्तरीय २१ किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. तसेच या स्पर्धेत त्याने टाइम ट्रायल बेस्ट प्लेअरचा किताबही मिळाला. या कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व प्रवासात त्याला मोठा भाऊ अजिंक्य याचा खंबीर पाठिंबा आहे.ग्रामीण भागातील मुलांचा खेळांकडे कमी ओढा असतो. मात्र आम्ही दोन्ही मुलांना खेळाकडे जास्त लक्ष देण्यास प्राधान्य दिले. मुलांनाही आवड असल्याने स्पर्धामध्ये सहभाग घेतला. कृष्णाने स्पर्धामध्ये यश मिळवत गावाचे नाव रोशन केले आहे. - उषा हराळ, आईनवनाथ खराडे