मांडवगण : श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कोळगाव, आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या घोगरगाव, भानगाव, टाकळी लोणार उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत कामठी, बनपिंप्री, घोगरगाव, तरडगव्हाण, चवर सांगवी, थिटे सांगवी, रुईखेल, बांगर्डे, खांडगाव, वडघूल, पिसोरे, देऊळगाव, बेलवंडी कोठार आदी गावे येतात. भानगाव, कोथूळ ही गावे कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. कोसेगव्हाण, टाकळी लोणार, तांदळी ही गावे आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. सध्या फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी म्हणजे मांडवगण, कोळगाव आणि आढळगाव तेथेच लसीकरण चालू आहे. दूरच्या गावाहून लसीकरण केंद्रापर्यंत जाताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक इच्छा असूनही लसीकरणापासून वंचित राहत आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार सर्व उपकेंद्रांवर लसीकरण सुरू करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश गोरे, थिटे सांगवीचे सेवा संस्था अध्यक्ष किसन उगले, डॉ. बाळासाहेब उगले, खांडगावचे सरपंच काका ढवळे, टाकळीचे माजी सरपंच शिवाजी जगदाळे, बापूराव कानगुडे, पत्रकार राजेंद्र घोडे आदी उपस्थित होते.
--
लसीकरण कोरोना लढाईतील ढाल
घोगरगाव उपकेंद्रावर लवकरात लवकर लसीकरण सुरू करण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले, तर लस ही कोरोना लढाईतील ढाल आहे. सुचित केलेल्या वयोगटातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. प्रदीप सुरासे यांनी केले.