रोजगार हमी योजनेचे शेतकरी व शेतमजुरांचे पैसे थकल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या भागातील शेतकरी फळबागा लागवडीकडे वळाले. यासाठी शासनाच्या फळबाग योजना फायदेशीर ठरतात म्हणून शासनाच्या फळबाग योजनेत शेतकरी सहभागी होतात. शासनाच्या कृषि विभागामार्फत पांडुरंग फुंडकर फळबाग योजना १७ डिसेंबरला सुरू झाली. ११ जानेवारीला बंद करण्यात आली. अतिशय कमी कालावधीमुळे ही योजना कधी सुरू झाली व कधी संपली हे शेतकऱ्यांना कळलेदेखील नाही. ही योजना अवघ्या १५ दिवसांत बंद करण्यात आली. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा ड्रॉ कधी निघाला? कोठे निघाला? याबाबतची कोणतीही माहिती कृषी विभागाच्या मंडल कार्यालयाकडून देण्यात येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात नाराजी आहे, तर रोजगार हमीतून फळबाग योजनेचे शेतकरी व शेतमजुरांचे पैसे थकले आहेत. शेतमजुरांचे थकलेले पेमेंट लवकरच अदा करावे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष ॲड. सतीश पालवे व आम आदमी पार्टीचे संयोजक किसनराव आव्हाड यांनी दिला आहे.