साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथील बंद असलेले सिग्नल सुरू करावेत. अन्यथा आयुक्तांची गाडी या चौकात अडविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
काँग्रेसच्यावतीने या मागणीबाबत महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. तसेच आयुक्तांना गुलाब पुष्पगुच्छ भेट देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या वाहतूक नियंत्रण केले जाते. मात्र वाहतुकीचे योग्य प्रकारे संचलन होण्यास अडथळा निर्माण होऊन अनेकदा ट्राफिक जाम होते. मनपा कार्यालया जवळ असणारा सिग्नलच बंद असून देखील मनपा झोपलेली आहे. तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयां जवळ असणारा सिग्नल बंद आहे. आयुक्त सुस्त असल्यामुळे सिग्नल बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीकडे आयुक्तांचे लक्ष नाही. नागरी प्रश्नांबद्दलच्या ते असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत.