अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा तत्काळ सुरू करा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याने इतर सेवा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांची भेट घेऊन इतर सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. गेल्या १ वर्षापासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा दिल्या जात नव्हत्या. कोरोना काळात अनेकांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे इतर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्यांना कठीण झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयांतील इतर सेवा सुरू करणे अपेक्षित होते, परंतु इतर सुविधा पूर्ववत केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्यांचा मोफत उपचार मिळतात. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातून रुग्ण येतात. परंतु जिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. कोविड पूर्वी ज्या सुविधा पुरविल्या जात होत्या, त्या तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली.