अहमदनगर : पारंपारिक वेशभूषेतील वाद्यपथके, भालदार, चोपदार, तुतारी आणि सर्वात पुढे वासुदेव अशा देखण्या ग्रंथदिंडीने शनिवारी सकाळी १८ व्या समरसता साहित्य संमेलनास प्रारंभ झाला.सावेडीतील रेणावीकर शाळेतून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. वैदुवाडी, अहिल्यानगरी चौक, भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रोड, किंग्ज कॉर्नर चौक, मार्गे ही ग्रंथदिंडी पुन्हा संमेलनस्थळी भीमराव गस्ती नगर येथे पोहोचली. या ग्रंथदिंडीचे चौकाचौकात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. सजवलेल्या पालखीमध्ये विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते.प्रारंभी संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, माजी संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोक गांधी, समरसता साहित्य परिषदेच्या प्रांताध्याक्षा श्यामाताई घोणसे, सहसमन्वयक सुनील भडगे, कार्यवाहक विनोद गोळे, रमेश पांडव, व्यवस्थापक श्रीकांत जोशी, कार्यवाहक नितीन दिनकर, महाव्यवस्थापक चंद्रकांत काळोखे आदी उपस्थित होते.तत्पूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, सेनापती बापट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लहुजी वस्ताद साळवे, चौथे शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नगरमध्ये समरसता साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:21 PM