पारनेर : पारनेर शहरामध्ये महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधण्यात आली असून आमदार विजय औटी यांच्या संकल्पनेतून हा राज्यात तालुकास्तरावर पहिलाच उपक्रम मानला जात आहे.पारनेर शहरात पारनेर-सुपा मार्गावर तालुका क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात व सुपा रस्ता, सिध्देश्वरवाडी रस्ता, पानोली रस्ता, लोणी रस्ता या रस्त्यांवर शहरातील महिला, युवती मोठ्या प्रमाणावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जात होत्या. सभापती सुरेखा भालेकर यांच्या प्रभागातील कामांच्या लोकार्पणप्रसंगी आ. ओैटी आले होते़ त्यावेळी औटी यांच्याकडे सभापतींनी हा प्रश्न मांडला होता. औटी यांनी महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारणीचे आपल्या अनेक दिवसांपासून विचार होता, असे सांगून तातडीने व्यायामशाळा उभारण्यात येईल असे आश्वासन दिले़ त्यानंतर नगर जिल्हा क्रीडा विभागाकडून निधी मंजूर करून औटी यांनी या अत्याधुनिक व्यायामशाळेची उभारणीही केली आहे.या व्यायामशाळेचे लोकार्पण येत्या सोमवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व आ. औटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सीमा औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, सभापती सुरेखा भालेकर, किसन गंधाडे, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांनी दिली.
महिलांमध्ये सुरक्षिततात रहावी, आरोग्य सुस्थितीत व्हावे व समाजात वावरताना महिलांना सक्षमपणे वावरता यावे यासाठी महिलांच्या व्यायामशाळेची उभारणी केली आहे.-विजय औटी, आमदार, पारनेर
आमदार विजय औटी यांच्यामुळे पारनेर शहरासह तालुक्यात प्रथमच महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली आहे़ या व्यायामशाळेमुळे महिलांना रोज व्यायामाची सवय लागून आरोग्यातही सुधारणा होईल़ त्यांना स्वत:चे संरक्षण करता येईल़ महिलांच्या या व्यायामशाळेचा पारनेर पॅटर्न राज्यभर जाणार आहे़-सुरेखा भालेकर, सभापती, महिला व बालकल्याण विभाग, नगरपंचायत,पारनेर