पारनेर : जगभरातील प्रमुख विद्यापीठांच्या प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांच्याकडून थेट शिक्षणासारखी सुविधा निर्माण करणारी व्हर्च्युअल क्लासरूम नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पारनेर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे पारनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊन शिक्षण मिळणार आहे.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले. व्हर्च्युअल क्लासरूमधून ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स देणे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध व्याख्यानांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, विविध ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणे, गुगल क्लासरूम, झूम ॲप, गुगल मीट, आदी माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणे, अशा विविध वैविध्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. हा विभाग अत्याधुनिक सोयी, सुविधांनी सुसज्ज असून, विद्यार्थ्यांसाठी भविष्यकाळाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, असे माजी सभापती राहुल झावरे यांनी सांगितले.
---
आज शिक्षणातून ज्या नवीन रोजगाराच्या संधी प्राप्त होतात, त्या मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या देशातीलच नव्हे, तर जागतिक पातळीवरील अनेक चांगले मार्गदर्शक, संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, कवी यांचे मार्गदर्शन मिळविणार आहोत. त्यामुळे जीवनाच्या पुढील वाटचालीत दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे.
-नंदकुमार झावरे,
अध्यक्ष, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, नगर
--
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने पारनेर महाविद्यालयासारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात उभारलेले व्हर्च्युअल क्लासरूमने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चित उपयोग होणार आहे.
-रंगनाथ आहेर,
प्राचार्य, पारनेर महाविद्यालय