श्रीगोंदा : जमावबंदी आदेश झुगारुन काही नेते व कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने कुकडीच्या आवर्तनात अडथळा निर्माण झाला आहे. काहींनी चाऱ्या उघडल्या तर काहींनी स्वत:च्या शेततळ्यात पाणी नेले. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने कि. मी. क्रमांक १३२ जोड कालवा बंद केला. वेळू तलाव, गवते खाण अर्धवट भरली आहे. त्यामुळे बाबुर्डी, लिंपणगाव, मढेवडगाव, म्हातारपिंप्री, लोणीव्यंकनाथ येथे जलसंकट उभे राहिले आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी भीषण पाणीटंचाई विचारात घेऊन वेळू तलाव व गवते खाण भरण्याचे आदेश करताना लोणीव्यंकनाथ केटीवेअर व गोठण तलावात पाणी सोडण्यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाने नियोजन करीत १३२ जोड कालव्यास पाणी सोडले, परंतु श्रीगोंदा, लोणीव्यंकनाथ व पारगाव सुद्रिक येथे रविवारी काहींनी चाऱ्या फोडून पाणी शेततळ्यात वळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने १३२ कालवा काही तास अगोदरच बंद केला. त्यामुळे काही नेत्यांचा मीपणा सामान्य नागरिकांना चांगलाच भोवला. सोमवारी रात्री उशिरा माजी मंत्री बबनराव पाचपुते व कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्यात १३२ ला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली. कोळी म्हणाले, ५०० एमसीएफटी पाणी वाढून मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पाणी सोडता येईल. ( तालुका प्रतिनिधी) ‘रेल रोको’चा इशारा कुकडीच्या पाण्यासाठी बाबुर्डी, मढेवडगाव, म्हातारपिंप्रीमधील कार्यकर्त्यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना घेराव घातला तर भाजपाचे लिंपणगाव येथील कार्यकर्ते नंदकुमार कोकाटे यांनी लिंपणगाव येथील तलावात पाणी सोडावे, यासाठी रेल रोको करण्याचा इशारा दिला. पोलीस गायब, कालवा बंद जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुकडी कालव्यावर जमावबंदी आदेश लागू केला होता. रविवारी १३२ वरील चाऱ्या ठिकठिकाणी फोडण्यात आल्या. त्यामुळे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले. मात्र एकही पोलीस अथवा अधिकारी कालव्यावर फिरकला नाही, त्यामुळे नियोजन कोलमडले. परिणामी १३२ चा कालवा प्रशासनास काही तास अगोदरच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे चार गावांवर जलसंकट उभे राहिले आहे.
कुकडीच्या आवर्तनात राजकीत अडथळा, प्रशासन हतबल
By admin | Published: May 03, 2016 11:42 PM