कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या किटचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तपासणी करण्यासाठी गरज असलेल्या रॅपिड अँटिजन किटचा पुरवठा लोकप्रतिनिधींकडून होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी शासनाकडून किट उपलब्ध होत नाही, याची कबुली देऊन सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? असा सवाल कोपरगाव भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थित केला आहे.
काले म्हणाले, सद्य:स्थितीत नागरिकांना अँटिजन चाचणी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून चाचणी किट उपलब्ध होणे क्रमप्राप्त आहे; परंतु गेल्या आठ दिवसांपासून शासनाकडून किटचा कोणत्याही प्रकारचा पुरवठा झालेला नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना चाचणीचे किट उपलब्ध होतात तर प्रशासनास किट उपलब्ध होत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाकडे किट पुरवठा करण्यासाठीही पुरेसा निधी नाही काय? कोरोनासारख्या महामारीने आधीच नागरिक भयभीत झालेले असताना आता चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले किटही जर लोकप्रतिनिधींना पुरवावे लागतात तर शासन काय करते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
--