अहमदनगर : राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’(यूनिफाईड डीसीपीआर) लागू केली असून त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांधकाम परवानगी दिली जाईल. वाढीव एफएसआयसह बांधकामबाबतचे अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतल्याने लोकांना स्वस्तात घरे मिळतील, असा विश्वास नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास आढावा बैठक झाली. त्यावेळी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार लहू कानडे, आशुतोष काळे, निलेश लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, नवीन एकसमान बांधकाम नियमावलींच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. पूर्वी राज्यात प्रत्येक नगरपालिका व महापालिकेतील बांधकाम नियम वेगळे होते. त्यात अनेक त्रुटी होत्या. यामुळे बांधकाम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत. यामुळे संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी अशी मागणी होती. त्यामुळे हा निर्णय घेऊन शेवटच्या घटकापर्यंत त्याची माहिती व्हावी, म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा सुरू आहे.