शिर्डी : शिर्डी येथे ३१ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान एक दिवसीय सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास राज्यमंत्री विजय शिवतारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील २५ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
कोऱ्हाळे (ता.राहाता) येथे १५ हेक्टर क्षेत्रामध्ये वनविभागातर्फे ३७ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या परिसराला ‘सरपंच वाटिका’ असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या मालकीच्या मौजे निमगाव कोऱ्हाळे शिवारात पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. गावठाणांचा ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभराज्यातील नगर भूमापन योजना लागू नसलेल्या सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करुन घेण्यासह गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फ त ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.