नेवासा : उपनगरातील प्रभाग सहामधील सावतानगर परिसरात कोरोना काळातही पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच शनिवारी ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सात दिवसात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग सहामधील सावतानगर परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहे. परंतु, या पाईपलाईनवर अनेक अनधिकृत जोड आहेत. तसेच हंडीनिमगाव शिवारातील काही भागही याच पाईपलाईनवर आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत राहिलेला नाही. येथील नागरिक कूपनलिकेचे पाणी वापरत होते. परंतु, कूपनलिकेला पाणी नसल्याने व नगरपंचायतचा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
त्यामुळे नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला. सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर पुन्हा आंदोलन करून, असा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, सागर शिंदे, रवी रासकर, गणेश जगताप, बाळासाहेब दारकुंडे, दीपक कुरुंदकर, संजय गाडेकर, गणेश कांबळे, किरण गोलवड, सचिन क्षीरसागर, आप्पा घोडेचोर, मयूर वाघ, राजेंद्र जाधव, गणेश हाराळे, कैलास लष्करे, सागर गायकवाड, किशोर मगर, मोहन कळमकर, अरुण आहेर, लकेश जाधव, महेश यादव, कैलास जाधव, नीलेश रासकर, गणेश शिंदे, मुकेश जाधव, भरत पारधे, अजिंक्य टेमक, आकाश सौदागर, प्रकाश बनकर, वैभव यादव उपस्थित होते.
---
नगरपंचायतीच्या चार वर्षांच्या काळात सावतानगर येथे रस्ते, भूमिगत गटारी, पथदिवे आदी सुविधा नगरपंचायत प्रशासनाने दिल्या नाहीत. शहरात कामे सुरू असून या भागाला साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. मात्र घरपट्टी, पाणीपट्टी वसूल केली जाते.
-नितीन जगताप,
शहर प्रमुख, शिवसेना, नेवासा