अरूण वाघमोडेअहमदनगर : ‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मिळेल ती नोकरी करण्याची तयारी आहे ’ अशी भावना पारधी समाजातील सुशिक्षित तरूण, तरूणी आणि त्यांच्या आई-वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने रविवारी पारधी समाजातील तरूणांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसह त्यांचे कुटुंबीयही मेळावास्थळी उपस्थित होते.पिंपळवाडी (कर्जत) येथील नववी शिकलेला वालचंद काळे तर आठवी शिकलेली त्याची पत्नी शुभांगी मेळाव्यात सहभागी झाले होते. शिक्षण घेता आले नाही. आहे त्या शिक्षणावर नोकरी करण्याची इच्छा आहे. इतर ठिकाणी कायमस्वरूपी काम मिळत नाही. असे मत त्या दाम्पत्याने व्यक्त केले. वालचंद याचे वडील शशिकांत व आई कलावती म्हणाले, आमचे आयुष्य कसे तरी कडेला गेले़ आमच्या मुलांना काम मिळून त्यांना मानाने जगता यावे अशीच इच्छा आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेतलेल्या नोकरी मेळाव्यातून मिळालेली नोकरीची संधी आमच्यासाठी आधार ठरेल.रेखा चव्हाण, यशोदा काळे, प्रियंका शिंदे, अगीना भोसले, पूजा चव्हाण, सतीश काळे, अनिल चव्हाण हे नववी-दहावी शिकलेले तरूण-तरूणी मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यांना मेळाव्यात जॉब कार्ड देण्यात आले.या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांत त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. बाहेर जाऊन काम करून कुटुंबाला हातभार लावण्याची आमची इच्छा आहे. आमच्या समाजातील अनेक तरूण मुले आहे त्या शिक्षणावर मिळेल तेथे काम करतात. कितीही अडचण आली तरी गुन्हेगारीकडे वळणार नाही अशी भावना या मुलांनी व्यक्त केली.जॉब कार्डचे वाटपमेळाव्यात आलेल्या तरूणांना जॉब शोकेसच्यावतीने जॉब कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सदर तरूणांना वर्षभरात विविध कंपन्यात नोकरीची संधी मिळणार आहे.पहिल्यांदाच आमचा विचार केलापोलिसांचे आणि आमचे नाते खूप जुने, पण ते वेगळ्या कारणासाठी. आज मात्र पोलिसांनी आमच्या मुलांना मानाने बोलावून त्यांच्या भविष्यासाठी चांगला उपक्रम घेतला. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच आमचा विचार कुणी तरी केला असे मत उत्तम चव्हाण, कृष्णा तांदळे, साखराबाई चव्हाण या ज्येष्ठ व्यक्तींनी व्यक्त केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहणा-या पारधी समाजाला इतर समाजाने स्वीकारून त्यांच्याविषयीची भावना आता बदलावी असे मत यशोदा चव्हाण (बेलवंडी कोठार) व सतीश काळे (गेवराई) सुशिक्षित मुलांनी व्यक्त केली.११२० मुलांना मिळाली नोकरीपरिक्षेत्रीय नोकरी मेळाव्यात पोलीस पाल्य व पारधी समाजातील एकूण ३२०० मुलांनी सहभाग घेतला होता. यापैकी ११२० मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे. १४४० मुलांची दुय्यम निवड फेरीसाठी नियुक्ती झाली आहे. रविवारी निवड झालेल्यांपैकी ८० मुलांना मेळावास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात एकूण ५२ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता.
‘पालावर राहणं.. रानात भटकणं.. पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं नकोस झालयं साहेब; नगरमध्ये पारधी समाजानं पोलिसांमोर मांडली व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:30 AM
‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय.
ठळक मुद्देजिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने रविवारी पारधी समाजातील तरूणांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांसह त्यांचे कुटुंबीयही मेळावास्थळी उपस्थित होते.एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मिळेल ती नोकरी करण्याची तयारी आहे ’ अशी भावना पारधी समाजातील तरूण, तरूणी आणि त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.त्यांना मेळाव्यात जॉब कार्ड देण्यात आले. या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांत त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.