घारगाव : संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे ग्रामपंचायतीच्या मालकीचा सार्वजनिक पाणी पुरवठा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या तलावात येथील काही ग्रामस्थ १० आॅगस्ट २०१९ पासून अनधिकृतपणे विद्युतपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा करत होते. हा अनधिकृत पाणी उपसा बंद करावा अशा वेळोवेळी ग्रामसेवकांनी नोटिसा बजाविल्या होत्या. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामसभेत त्यांच्याविरुद्ध सर्वानुमते ठराव झाला. ग्रामविकास अधिकारी आतीफ फाहीम शेख (वय-२१, रा. शिवाजीनगर,ता.संगमनेर ) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी देवराम अहिलाजी काळे, प्रभाकर महादू फटांगरे, मुरलीधर लहानु खरात, रवींद्र दादा खरात, बाजीराव सूर्यभान फटांगरे, शिवाजी सखाहारी फटांगरे, सूर्यभान सयाजी फटांगरे, संपत धोडींबा फटांगरे, बाळकिसन नामदेव फटांगरे, शांताराम अमृता फटांगरे (सर्व रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारखी करीत आहेत.
पोखरी बाळेश्वर तलावातून पाणी चोरी; दहा जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:59 PM