करंजी : पाथर्डी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात आज पहाटे चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी धाडसी चोरी करून मंदिरातील दानपेटी, दागिने, मुखवटे असा अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. संतप्त ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करित आहेत.पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील काळ भैरवनाथ मंदिरात काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिरातील दोन दानपेट्या उचलून नेऊन मंदिराच्या पाठीमागील बाजूस फोडल्या. यातील अंदाजे दीड लाख रुपये, देवाचे अडीच ते तीन किलो वजनाचे चांदीचे मुखवटे, देवाच्या अंगावरील ३ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ३ ते ४ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंदिरातील चोरीची घटना कळताच श्वानपथकास पाचाराण करण्यात आले होते. नवरात्र महोत्सवात सातव्या माळेला लोहसर येथे मोठी यात्रा भरते, भाविक मोठया प्रमाणात भैरवनाथाच्या दानपेटीत रक्कम टाकतात. त्यामुळे यात्रा झाल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. मंदिरात चोरी झाल्याची बातमी परिसरात समजताच ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करित दोन दिवसात या चोरीचा तपास पोलिसानी न लावल्यास शुक्रवारी नगर - पाथर्डी महामार्गावर करंजी येथे रास्ता -रोको करण्याचा इशारा दिला.भैरवनाथ मंदिरात यापुर्वी चोरट्यांनी दोन वेळा चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. अनेक वेळा तक्रार करून पोलिस खात्याने दुर्लक्ष केले, हे पोलिसांचे अपयश आहे.-अनिल गिते, सरपंच, लोहसरकरंजी परिसरात चो-यांच्या प्रमाणात होत असलेली वाढ ही गंभीर बाब आहे. करंजीत एका रात्रीत आठ घरफोड्या झाल्या. एकाही चोरीचा तपास लागला नाही. नागरिक रस्त्यावर उतरतील.-बाळासाहेब अकोलकर, सरपंच, करंजी
लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरात चोरी : ३ ते ४ लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:26 PM