पळवे : पारनेर तालुक्यातील वडनेर-हवेली फाट्यावर कुटे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने वडनेर-हवेली फाट्यावर शहीद स्मारकात शहीद जवान अरुण बबनराव कुटे यांचा ६० किलो पंचधातूंचा पुतळा बसविण्यात आला होता. हा पुतळा एक वर्षापूर्वी चोरट्यांनी चोरून नेला होता. हा पुतळा तब्बल एक वर्षानंतर गुरुवारी रात्री वडनेर हवेली-जामगाव रोडवरील एका खड्ड्यात आढळून आला. दरम्यान, पुतळा पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.वडनेर हवेली येथे सैन्य दलातील शहीद जवान अरुण बबन कुटे (वय २२) यांच्या पुंछ राजोरी (जम्मू-काश्मिर) या ठिकाणी अतिरेकी हल्ल्यात एक वर्षापूर्वी शहीद झाले होते. त्यांनी तीन अतिरेक्यांचा खात्मा करून स्वत: देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून कुटे परिवार व वडनेर हवेली ग्रामस्थांनी शहीद स्मारकात शहीद जवान अरुण कुटे यांचा पुतळा बसविण्यात आला होता. हा पुतळा चोरट्यांनी वर्षभरापूर्वी चोरून नेला होता. याबाबत सुपा पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनाही या पुतळ्याचा तपास लागत नव्हता. पुतळ्याचा तपास लागत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, माहिती सेवा समिती तालुका अध्यक्ष शरद रसाळ यांच्यासह वडनेर हवेली ग्रामस्थांसह कुटे परिवाराने शहीद स्मारकामध्ये मौन, आत्मक्लेश आंदोलन केले होते. ‘लोकमत’नेही वेळोवेळी पुतळा चोरीबाबत आवाज उठविला होता.
६० किलो पंचधातूचा वर्षापुर्वी चोरीला गेलेला पुतळा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:57 PM