श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस पथकाच्या वाहनांवर बेलवंडी शिवारातील गावठी दारू तयार करणाऱ्या टोळीने दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाची काच फुटली. मात्र, सुदैवाने एकही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली.
बेलवंडी पोलिसांनी सुरेश पवार, राजू पवार, विजय पवार यांच्या विरोधात दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे. मात्र, दगडफेकीची घटना पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवली.
पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी शिवारातील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी बेलवंडी पोलिसांचे पथक गेले होते.
दारूभट्ट्या फोडल्याचा राग धरून अंधारात जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, काच फोडल्याची घटना गुलदस्त्यात ठेवली. ही घटना पोलिसांनी का गुलदस्त्यात ठेवली, याचे कारण मात्र समजलेले नाही.
---
पोलीस पथक दारूभट्ट्या फोडण्यासाठी शुक्रवारी रात्री नऊ वाजता गेले होते. अंधारात कोणीतरी दगड मारला होता. मात्र, काहीच झालेले नाही. गावठी दारू तयार करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- संपतराव शिंदे,
पोलीस निरीक्षक, बेलवंडी
---
पोलिसांची भूमिका संशयास्पद..
दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर दारू विक्रेते हल्ला करतात. मग पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान व सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल का केला नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतच संशय निर्माण होत आहे.