कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी याविरोधात कठोर पाऊल उचलले तर त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. त्यामुळे महावितरणने ही मोहीम त्वरित थांबवून कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी दिला आहे.
कोल्हे म्हणाले, देशासह राज्यभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला. लाॅकडाऊन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थिक विवंचना कमी होईल, असे वाटत असतानाच महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. यामुळे रब्बीतील पिकेही हातची जावून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
..
निर्णय अन्यायकारक
वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीजबिलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे १०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करून वीजप्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. खरिपातील पिके वाया गेल्याने ती उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटलेले नाही. रब्बीच्या मोसमात विहिरीमध्ये पाणीसाठा असताना वीजप्रवाह खंडित केल जात असल्याने संकटात अधिकच भर पडल्याचे कोल्हे यांनी सांगितले.