कर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून संबधित अधिका-यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा नातेवाईकांचा निर्णय घेतला आहे.कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या आहेत प्रमुख मागण्या :- शहीद तौसीफ शेख याला न्याय मिळावा. - कुटुंबियासाठी 50 लाख रूपयांची मदत आणि नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्यात यावी.- यासह दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत अतिक्रमण तात्काळ काढावे- दावल मलिक जागेतील अनाधिकृत झालेल्या खरेदी तात्काळ रद्द करावी. - पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक आणि तालुका प्रशासन यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा- नगरपंचायत बरखास्त करत पालकमंत्री राम शिंदे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा.- मागण्यांबाबत ठोस आश्वासन आणि कारवाई होइपर्यंत शहीद तौसीफ शेख यांच्यावर दफन करण्यात येणार नाही, अशी एकमुखी मागणी कर्जत रास्तारोको आंदोलनादरम्यान करण्यात आली.
कर्जतमध्ये कडकडीत बंद : अधिका-यांवर गुन्हे दाखल करा, त्यानंतरच अंत्यविधी : पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:13 AM