जामखेड : हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथे सुरू करावे, कुकडीचे पाणी, तालुक्यातील प्रभारी राज यासह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.येथील खर्डा चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको आंदोलन दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले म्हणाले, जामखेड हे तालुक्याचे व दळणवळणासाठी सोयीचे ठिकाण असताना शेवटच्या टोकावर असलेल्या खर्डा येथे हरभरा खरेदी केंद्र मर्जीतील कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी सुरू केले. आमचा खर्डा खरेदी केंद्राला विरोध नाही़ पण जामखेड येथेही खरेदी केंद्र सुरू करावयास पाहिजे होते. भूम, परांडा, बार्शी येथील व्यापा-यांचा हरभरा घेण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी खर्डा येथे कार्यकर्त्यांना केंद्र दिला अल्याचा आरोप शहाजीराजे भोसले यांनी केला.तालुक्यातील प्रमुख कार्यालयात तहसील, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, जि. प. बांधकाम व पाणीपुरवठा अशी महत्वाची पदे आठ महिन्यांपासून रिक्त असून पालकमंत्री व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भितीपोटी कोणी अधिकारी येथे यायला तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढल्यानंतर जिल्हा परिषद गेस्ट हाऊस, पंचायत समिती कार्यालयासमोर व बसस्थानक परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून तेथे अतिक्रमण धारकांना प्राधान्याने गाळे द्यावे, शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करावा, बाजार समितीच्या आवारातील बैलबाजार जागेत पदाधिका-यांनी भूखंडाचे अनधिकृत वाटप केले. याची चौकशी करावी व निविदा काढून वाटप करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास जाधव, शिवसेना नेते लक्ष्मण कानडे यांनी भाषणे केली. यावेळी शिवसेना नेते अंकुशराव उगले, तालुका उपप्रमुख संतोष वाळुजकर, मोहन जाधव, दत्ता शिंदे, संदिप भोरे, राहुल उगले, राजू पाचारे, हर्षल मुळे आदी शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे चारही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.
शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर जामखेडमध्ये शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:18 PM