कर्जत : ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटावर बंदी घालावी या चित्रपटात राजपूत समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात आला आहे म्हणून हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्यातील राजपूत समाजाच्यावतीने कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी... पदमावत फिल्म नही चलेगी. जर ही फिल्म कोणी दाखवलीच तर तेथे राडा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या मोर्चात चंदनसिंग परदेशी, बबनसिंग परदेशी, सचिन परदेशी, धरम परदेशी, करण परदेशी, हेमंत परदेशी, तेजस परदेशी, विजय परदेशी, सोमनाथ परदेशी यांच्यासह राजपूत समाजातील अनेक युवक सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलन झाल्यावर कर्जत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा गेला. तेथे मागणीचे निवेदन दिले. यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजपूत समाजाच्या या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र फाळके, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, बजरंगवाडीचे सरपंच अंगद रूपनर, गणेश शेळके यांनी पाठिंबा दिला होता.
‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालावी, यासाठी कर्जतला राजपूत समाजाचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 4:29 PM