कोतूळ : विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव खांड येथे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अचानक एस. टी . बस अडवून आंदोलन केले. पिंपळगावसाठी सकाळी शालेय वेळत दोन बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.पिंपळगाव खांड धरणाच्या जलाशयात कोतूळ पूल बुडाल्याने वाहतूक मोग्रस पिंपळगाव मार्गे अकोले अशी वळवण्यात आली. मात्र धामणगाव ते पिंपळगाव या दहा किलोमीटर अंतरातील रस्ता वेड्या बाभळी, अतिक्रमणे, खड्ड्यामुळे धोकादायक झाला आहे. त्यामुळे ही वाहतूक चिंचखांड मार्गाने वळवण्यात आल्याने पिंपळगावातून सकाळी शालेय वेळेत येत नाहीत. त्यामुळे आज सकाळी पिंपळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुमारे चार तास रास्ता रोको आंदोलन केले.सहायक वाहतूक निरिक्षक ए. बी. लांघी, वाहतूक नियंत्रक त्र्यंबक कोकतरे, एस. टी. कामगार सेनेचे संतोष भोर, वाहक एकनाथ बांडे यांच्याशी माजी सरपंच शिवाजी वाल्हेकर, दगडू हासे, राष्ट्रवादीचे धनंजय देशमुख यांनी चर्चा केली. दूरध्वनीवरून जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पिंपळगावखांडमध्ये विद्यार्थ्यांनी केला चार तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:26 PM