नेवासा : गेल्या पाच महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले. कर्मचाऱ्यांनी दुपारी अचानक शहरातील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
काही तासांच्या घडामोडीसह झालेल्या चर्चेनंतर प्रभारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दिवसरात्र काम करणाऱ्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसाठी नेवासेकरांनी जागृत होऊन त्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे, असे आवाहन संजय सुखदान यांनी केले.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून थकीत असलेले वेतन नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी एक आठवडा अगोदरच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र कोणताही तोडगा न काढल्याने सोमवारी सकाळी ८ वाजता नगरपंचायत चौकात नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत उपोषणस्थळी कोणताही अधिकारी न आल्याने संजय सुखदान यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना बरोबर घेत प्रथम नगरपंचायत चौकात उपोषणस्थळी रास्ता रोको केला. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रीरामपूर रस्त्यावरील श्री खोलेश्वर मंदिर चौकात सर्व कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी भाजपचे मनोज पारखे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरिश चक्रनारायण, विकास चव्हाण, शिवसेनेचे अंबादास लष्करे यांची भाषणे झाली.
सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या मध्यस्थीने अल्प काळ रास्ता रोको थांबविण्यात आला. मात्र त्यानंतर सलग दीड तास गणपती मंदिराच्यासमोर बसून कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी श्रीरामपूर येथून येईपर्यंत उपोषण केले. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी थकीत वेतनापैकी ऑक्टोबर महिन्यातील वेतन १ फेब्रुवारी तर नोव्हेंबर २०२० चे वेतन १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येईल, असे लेखी दिल्याने उपोषणासह रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
फोटो : २५ नेवासा रास्ता रोको
नेवासा येथे खोलेश्वर गणपती मंदिरासमोर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केला.