नेवासा : वांबोरी चारी पाईपलाईन योजनेतून शेती सिंचनासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पांढरीपूल येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. मुळा पाटबंधारे विभाग शासनाला याबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे लेखी अश्वासन दिल्यानंतर रस्तारोको मागे घेण्यात आला.यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार रुपेश सुराणा व पाटबंधारे विभागाचे अभियंता मोरे यांना देण्यात आले. अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे आणि प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार यांनी या रस्तारोको आंदोलनाचे नेतृत्व केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला परिसरातील पांगरमल, राजेगाव, मोरगव्हाण, मांडेगव्हाण, झापवाडी, वाघवाडी, शिंगवे तुकाई, खोसपुरी येथील ग्रामस्थ जनावरांसह सहभागी झाले. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा विमल अनारसे, ज्ञानेश्वर सांगळे, बाळासाहेब खजुर्ले, अण्णासाहेब चौधरी, नवनाथ कडू संजय नाचण, रघुनाथ शिंदे, महिला आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलनाप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
वांबोरी चारीच्या पाण्यासाठी ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 7:25 PM