अहमदनगर : कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेत काम करणा-या ५५ कंत्राटी कर्मचा-यांनी कचरा उचलण्याचे काम मंगळवारपासून बंद केले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलित करून तो डेपोपर्यंत नेण्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे कच-याने भरलेले कंटेनर जागेवरच राहण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांपासूनचे मजुरांचा पगार न दिल्याने हे काम बंद केले आहे.
शहरातील रस्त्यावर, कुंड्यात साचलेला कचरा घंटागाडीतून संकलित करणे, कंटेनर वाहून नेणे, कुंड्यातील कचरा उचलून तो डेपोत ओतणे या कामासाठी महापालिकेने ठेकेदारामार्फत ५५ कंत्राटी कामगार नियुक्त केले आहेत. मात्र या मजुरांच्या चार महिन्यांच्या पगाराची रक्कमच महापालिकेने अदा केली नाही. ही रक्कम १८ लाख रुपये एवढी आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या काळात शहराच्या स्वच्छतेसाठी अतिरिक्त ५० मजूर कामासाठी घेतले होते. त्यांचेही दोन महिन्यांचे १२ लाख रुपयांचे मानधन अद्याप अदा करण्यात आले नाही. असे एकूण ३० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी ठेकेदाराने महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांच्याकडे केली आहे. मात्र या मागणीकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने काम बंद करावे लागले, असा ठेकेदाराचा आरोप आहे.
बुरुडगावलाही अडविला कचराराष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा आधार घेत बुरुडगाव ग्रामस्थांनीही कचरा घेवून येणारी वाहने अडविली आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही बाजुंनिही कचरा कोंडी झाली आहे. शहराचा कचराही सावेडीमध्येच टाकला जात आहे. या दोन्ही कारणामुळे शहरात पुन्हा एकदा कचरा कोंडी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे १४ व्या वित्त आयोगाचा ११ कोटीचा निधी पडून आहे. तरीही सदरचा विभाग एक रुपयाचाही खर्च करीत नाही. स्वच्छता अभियानात कंत्राटी मजुरांनी दिवस-रात्र काम केले आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्या काळात काम केलेल्या दोन महिन्यांचे पगारही महापालिकेने दिले नाहीत. तसेच चालू कामाचा मजुरांचा पगारही दिला नाही. त्यामुळे मजुरांनी काम बंद केले आहे. असून कचरा वाहतुकीचे काम सध्या बंद आहे.-अभिषेक भोसले, कंत्राटदार