शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. सत्तेवर असताना पक्ष कार्यालयात जाण्याचे नेत्यांनी बंद केले. पक्षाची शिबिरेही थांबली, अशी खंत माझी मंत्री व काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून देशांतील लोकशाही डळमळीत झाली आहे, अशी भीती थोरात यांनी व्यक्त केली.
कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार श्रीरामपूर येथे रविवारी सायंकाळी माजीमंत्री थोरात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, सचिन गुजर, साधना गायकवाड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते आदी यावेळी उपस्थित होते. खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
थोरात म्हणाले, भारतीय लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. पुढील काळात मताचा अधिकार देखील सुरक्षित राहण्याविषयी आपल्याला शंका आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सरकारने मागे घेतले. मात्र याबरोबरच तीन नवीन कामगार कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यात कामगारांना युनियन करण्याची संधी देखील काढून घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचे काय होणार, याची काळजी वाटावी अशी स्थिती आहे. हे असे का घडले याचा विचार करणे गरजेचे आहे. काँग्रेससह डावे पक्ष पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात कमी पडले. लोकशाही मूल्ये तरुणांमध्ये रुजविण्यात आपण सर्वजण कमी पडलो. राष्ट्र सेवा दलांची शिबिरे काही प्रमाणात सुरू आहेत, असे थोरात म्हणाले.