राशीन : सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास राशीनसह परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. दरम्यान आज सायंकाळपर्यंत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल यंत्रणेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी यापैकी कोणीही फिरकले नव्हते.वादळी वा-यासह जोराच्या मुसळधार पावसामुळे राशीनसह परिसरातील राजेवस्ती, सायकरवस्ती, करपडी, गवळरान वस्त्यांवर शेतक-यांची चारा पिके घास, मकवान अशी पिके भुईसपाट झाली. डाळिंब-लिंबू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्याच्या कडेची मोठमोठी झाडे भिगवण राज्यमार्गालगत उन्मळून पडली. सायकरवस्तीवरील हॉटेलचे छत कोसळले. विजेच्या खांबावरील तारा तुटून रानात पडल्या. वा-याचा जोर व विजांचा गडगडाट एवढा जबरदस्त होता की,काही कळायच्या आत सर्वत्र धुळीचे लोळ उठल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सायकर व रोहिदास रोडे यांनी सांगितले. मात्र जीवित हानी झाली नसली तरी शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीस मिनिटाच्या जोरदार वा-यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली.बारडगाव, सिद्धटेक,भांबोरा भागात पिके भुईसपाटबारडगाव, साखर कारखाना, गणेशवाडी,ताजू, भांबोरा, सिध्दटेक येथे जोराच्या वा-याने शेतक-यांच्या बागांचे नुकसान झाले. चारा पिके भुईसपाट झाली. जलालपूर येथील पवारवस्तीवरील घराचा पत्रा उडून मोकळ्या ठिकाणी पडला. नवनाथ मेंडगे यांच्या बागेतील डाळिंबाची बारा झाडे उन्मळून पडली. वडारवस्ती परिसरातील विजेचा खांब पडल्याचे शिवसेनेचे जलालपूर विभागप्रमुख पौरष तिवारी यांनी सांगितले.