प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव परिसरात आमदार कानडे हे बुधवारी दौऱ्यावर होते. यावेळी पटेलवाडी, उक्कलगाव रस्ता ओलांडून बाजूच्या शेतामध्ये दोन रोहित्रे बसवण्यात आल्याचे त्यांनी पाहिले.
मात्र तेथील धोकादायक व वीज वाहिनीमुळे त्यांनी तेथेच गाडी थांबवून खाली उतरले. रोहित्राच्या खालच्या केबल्स थेट जमिनीपर्यंत लोंबताना आढळल्या तर शेतातून जाणाऱ्या एलटी लाईनच्या तारा शेतात मशागत करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्याला सहज चिकटतील अशा स्थितीत होत्या. आमदारांनी शेजारच्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले तेव्हा याबाबत वारंवार तक्रार करुनही वीज मंडळाचे अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
यानंतर आमदार कानडे यांनी उपअभियंत्याला दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी येण्याचे कबूल केले.
परंतु बराच वेळ थांबूनही अधिकारी आले नाहीत. शेतामध्ये लोंबकळणाऱ्या तारा आणि जमिनीशी स्पर्धा करणाऱ्या केबल्स यांचे छायाचित्रे काढून आमदारांनी अधिकाऱ्यांना पाठवले आणि सदरचे काम चार दिवसात पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याचा इशारा दिला. शेतात काही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे लेखी पत्र कार्यकारी अभियंत्याला आमदारांनी रवाना केले. आमदारांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
_____
फोटो ओळी : आमदार कानडे
उक्कलगाव परिसरात वीज मंडळाच्या कामांची अचानक पाहणी करताना आमदार लहू कानडे.