घारगाव : संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक,वनकुटे, भोजदरी परिसरात सोमवारी (दि.१२) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने कोठे बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या सीडी वर्क पुलाखालून वाहत जाणाऱ्या ओढ्यांना अचानक पुराचे स्वरूप आले. अचानक रस्त्यावर पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झाली. शाळा सुटल्याने येथील ग्रामस्थांनी मानवी साखळी करत या पाण्यातून विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचविले.आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने पठारभागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. कोठे बुद्रुक,वनकुटे, भोजदरी आदी ठिकाणी सोमवारी जोरदार पाऊस पडल्याने शेतकरीवर्गाची दाणादाण उडाली. अचानक आलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने ओढे, नाले, ओहोळ पूरपाण्याने भरून वाहू लागले. कोठे बुद्रुक येथील मुक्ताईचा ओढा व खंडोबा मंदिर परिसरातील ओढा या ओढ्यांना अचानक पुराचे स्वरूप आले. रस्त्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला. त्यामुळे काही काळ अनेक गावांचा संपर्क तुटला. वाहतूक विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी अडकले. काही वेळाने पाण्याचा प्रवाह कमी झाला. ग्रामस्थांनी मानवी साखळी करत या पाण्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढत सुखरूप घरी पोहोचविले.सततच्या पावसाने बळीराजा वैतागलासंगमनेर तालुक्यातील पठारभागात पावसामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. यंदा पावसाने व मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनाने त्रस्त शेतकरी आता आर्थिक संकटाच्या खाईत सापडला आहे. पिकांमध्ये साचलेले पाणी कसे काढावे याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. मुसळधार पावसाने सर्व आशांवर पाणी फिरविल्यासारखे झाले आहे.
ओढ्यांना पुराचे स्वरूप, मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचवलं घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 9:16 PM