अण्णा नवथर । रोहित टेके । अनिल साठे ।
लोकमत स्टींग
अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे. या योजनेचे निर्देश नाहीत, अशी काहीही योजना नाही, अशी उत्तरे देऊन पथविक्रेत्यांना थेट कर्जास नकार दिला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.
काय आहे योजनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात पथविक्रेत्यांचे व्यवसाय बंद होते. त्यामुळे पथविके्रत्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेची घोषणा केली. हा आदेश १७ जून २०२० रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका आणि बँकांना पाठविण्यात आला. या योजनेतून छोट्या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
‘लोकमत’ने कसे केले स्टिंग आॅपरेशन‘लोकमत’ने मंगळवारी (७ जुलै) एका विक्रेत्याला स्वत: बँकेत पाठवून कर्जाची मागणी करायला लावली. यादरम्यान होणा-या संवादाचे रेकॉर्डिंग करण्यास सांगण्यात आले. अहमदनगर शहर, कोपरगाव, शेवगाव येथील बँकांमध्ये जाऊन विक्रेत्यांनी पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेतून कर्जाची मागणी केली. परंतु हा आदेश आमच्याकडे आला नाही, असे सांगत कर्जास नकार दिला.
या संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारचे सर्क्युलर आलेले नाही. सर्क्युलर आले असते तर गरिबांना मदतच केली असती.-मनोरंजन मोहंती, व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, कोपरगाव शाखा.
युनियन बँकेच्या प्रोफेसर चौकातील शाखेत व्यवस्थापक नाहीत. त्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नाहीत़. परंतु, पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना अटी व शर्तींचे पालन करून युनियन बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तशा सूचना सर्व शाखांना देण्यात येतील.-मुशीर खान, जिल्हा समन्वयक, युनियन बँक