अहमदनगर : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पार्टीशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपाचा कोणताही नेता त्यांच्या संपर्कात नाही. सुजयच्या उमेदवारीची चर्चा ही तर विखे यांच्या दबावतंत्राचा भाग आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.दानवे मंगळवारी औरंगाबादहून पुण्यास जात असताना खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी अचानक न्याहरीसाठी थांबले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभेसाठी भाजपाचा एकही उमेदवार निश्चित नाही. राज्याची पार्लमेंट्री बोर्डाची पहिली बैठक सात तारखेला होणार होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे ही बैठक आता ११ मार्चला होणार आहे. पहिल्या बैठकीत पक्षाच्या उमेदवारीबाबत चर्चा होईल. दुसरी बैठक झाल्यानंतर केंद्राच्या पार्लमेंट्री बोर्डाकडे राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी पाठवण्यात येईल. केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डने मान्यता दिल्यानंतर उमेद्वार जाहीर करण्याची भाजपची पद्धत आहे. मी प्रदेशाध्यक्ष असलो तरी अद्याप माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही.
मुलाच्या उमेदवारीसाठी विखेंचे दबावतंत्र - दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 4:33 AM