अकोले : शहरात व ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांच्या गावात कडक लॉकडाऊन पाळला जात असतानाही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. वेगवेगळी कारणे देऊन मोकार फिरणाऱ्यांमुळे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे. प्रशासनानेही अशा मोकाट फिरणाऱ्यांकडून पावणेपाच लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र, तरीही फिरणारे कमी होत नाहीत अन् कोरोना तालुक्याची पाठ सोडत नाही, अशी अवस्था झाली आहे.
भाजीपाला खरेदीसाठी, लस घेण्यासाठी व बँकांसमोर होणारी गर्दी कोविड संक्रमणास आमंत्रण मिळत आहे. त्यामुळेच पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना नियम पाळावेत, समाजाला आपली गरज आहे, अशा प्रतिक्रियाही तालुक्यात आता चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. नगरपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाने कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत जवळपास पावणेपाच लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. ११ दुकाने नगरपंचायतीने सील केले आहेत. पण, अकोलेतील सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची गर्दी कमी होताना दिसत नाही. १५ एप्रिल २०२१ पासून अकोले नगरपंचायतीने कोविड नियम न पाळणाऱ्या दुकानांवर १२५ कारवाया केल्या आहेत. दंड म्हणून १ लाख ४५ हजार रुपये वसूल केले आहे. आठ दुकानदारांनी प्रत्येकी १० हजार रुपये दंड भरला आहे. तरीही, बंद शटर दुकानाबाहेर एक व्यक्ती बसलेली असते. ग्राहक आला की, शटर वर करून माल बाहेर दिला जातो. पुन्हा शटर बंद केले जाते, असे सर्रास सुरू आहे. पोलीस प्रशासनाने १ जानेवारी २०२१ पासून ७ मे पर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ४२८ लोकांवर कारवाई करत ६१ हजार १५० रुपये व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर २८० कारवाया करत ५६ हजार रुपये दंड वसूल केला आहे.