अहमदनगर : महापालिकेने लागू केलेल्या कडक निर्बंधांचा अपेक्षेप्रमाणे फायदा झाला नाही, असे सांगून याबाबत जिल्हाधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त शंकर गोरे यांनी गेल्या दिवसांत शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची मुदत सोमवारी मध्यरात्री संपत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क साधला असता गोरे म्हणाले, गेल्या सात दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या काळात अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्या घटली नाही. रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु ती अपेक्षप्रमाणे नाही. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. या काळात किती चाचण्या केल्या गेल्या. त्यापैकी किती जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. निर्बंध लागू करण्यापूर्वी हे प्रमाण किती होते. त्यानंतर किती झाले, या संपूर्ण बाबींचा अभ्यास करून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली जाईल. शहरातील सात दिवसांची आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली जाईल. ते जो निर्णय देतील, त्यानुसार सोमवारी दुपारपर्यंत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे गोरे म्हणाले.
....
घरी जाऊन करणार कोरोना चाचणी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ज्या भागात रुग्ण सापडतील, अशा भागात महापालिकेची रुग्णवाहिका जाईल. रुग्ण वाहिकेतील कर्मचारी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची जागेवरच चाचणी करतील. सोमवारी नागापूर परिसरातून चाचणीला सुरुवात केली जाणार असून, चाचण्या वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.