अहमदनगर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवार (दि़ ११) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला असून, पाण्याचे योग्य आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केल्या़.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते. या बैठकीत मागील आवर्तनाचा आढावा घेण्यात आला. मागील आवर्तन सुमारे ५० दिवस सुरू होते़ या आवर्तनासाठी ६ हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणी वापर झाला. सध्या धरणात ४ टीएमसी पाणी शिल्लक आहे़ यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी शेतक-यांना फायदा होणार आहे. सर्वांना पाणी मिळावे, कुणीही वंचित राहू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा याची बैठकीत चर्चा झाली. विद्युत मोटारी बंद कराव्या, अनधिकृत उपसा कमी करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जागतिक मातृ दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व मातांचे प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिका राजळे यांचा सन्मान करण्यात आला.
मुळा धरणाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा-शंकरराव गडाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:22 AM