श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या खून प्रकरणाचे बेलापूर तसेच श्रीरामपूर शहरात रविवारी तीव्र पडसाद उमटले. दोन्ही शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना तत्काळ अटक झाली नाहीतर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. रविवारी बेलापूर येथील आठवडे बाजार होता. मात्र घटनेमुळे तो भरला नाही. शनिवारी देखील येथे बंद पाळण्यात आला होता. शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरात व्यापारी असोसिएशनने दुपारी १२ वाजता शहरातून फेरी काढली. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मुख्य रस्ता, शिवाजी रस्त्यावर फिरून व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर हनुमान मंदिर येथे सभा घेण्यात आली. यात पोलिसांच्या तपासाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. काही संशयितांची नावे देऊनही त्यांचे मोबाईल कॉल्स तपासण्यात आले नाहीत. त्यामुळे वेळ वाया गेला असा आरोप काही नेत्यांनी केला.
घटनेमुळे संपूर्ण व्यापारी समाज भयभीत झालेला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. हिरण यांच्याबाबत घडलेली घटना इतरांबाबतही घडू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा छडा लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन हाती घेण्याचा यावेळी इशारा देण्यात आला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक झाली नाही अथवा ठोस कारवाईचे आश्वासन मिळाले नाही तर मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका बेलापूर ग्रामस्थांनी घेतली आहे. घाटी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला मृतदेह सोमवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
-----------