बंगला फोडून साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे चोरट्यांनी बंगला फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. १४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात सखाराम कोंडाजी ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वाघ हे पुढील तपास करत आहेत.
पैसे चोरून वाहनांची केली तोडफोड
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाटा येथील हॉटेलमधून चोरट्यांनी रोख २२ हजार रुपये चोरले तसेच जाताना हॉटेलसमोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. १३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात देविदास लिंबाजी खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक बांगर हे पुढील तपास करत आहेत.
दागिन्यांवर डल्ला
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. १४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात संकेत सुनील घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बाबर हे पुढील तपास करत आहेत.
जाधव यांची निवड
अहमदनगर : मानवाधिकार अभियान संघटनेच्या शहराध्यक्षपदी विकास जाधव यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे यांच्या हस्ते जाधव यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकामध्ये झालेल्या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष राजू धोत्रे, विजय बेरड, रूपेश म्हस्के, अविनाश गायकवाड,नवनाथ शिदे, विकास माने, विलास धोत्रे आदी उपस्थित होते. यावेळी नगर तालुकाध्यक्ष पदी विजय बेरड, जिल्हा संपर्कप्रमुख पदी विलास धोत्रे, कर्जत तालुकाध्यक्ष पदी नवनाथ शिदे, कर्जत तालुका उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड,कर्जत तालुका संघटकपदी विकास माने याच्याही निवडी यावेळी करण्यात आल्या. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड,उपाध्यक्ष संध्या मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे यांनी केले.
फोटो- विकास जाधव