तिसगाव : दुकानांबाबतच्या बंधनांबाबत समज देऊनही न पाळल्याने तिसगाव ( ता. पाथर्डी ) येथे सोमवारी प्रशासनाने लाठीचे तडाखे देत आर्थिक दंड करून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
सकाळी नऊ वाजता बसस्थानकापासून आरंभ झालेल्या कारवाईत दुचाकी, चारचाकी चालकांसह पायी जाणारे विनामास्क नागरिकही सुटले नाहीत. गटविकास अधिकारी शीतल खिंडे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, बीट हवालदार आप्पासाहेब वैद्य यांच्यासह अकरा ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. दोन किराणा व एक स्टेशनरी चालकांला मोठा आर्थिक दंड करण्यात आला.
हुज्जत घालून दुकान चालकाने दंडाची पावती फेकल्याने अधिकारी चांगलेच संतापले. ज्येष्ठ महिलांनी माफी मागितल्याने प्रकरणावर पडदा पडला. दोन दिवसांपूर्वी फिरून समज दिली होती. तरीही मुजोरी सुरू असल्याने आजची दुसरी कारवाई मोहीम राबविली गेली असल्याचे गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी सांगितले.
डॉ. जगदीश पालवे, ग्रामसेवक भाऊसाहेब सावंत, प्रमोद म्हस्के, विठ्ठल राजळे, राजेंद्र ढाळे, सुहास शेळके, रवींद्र देशमुख, सुरेंद्र बर्डे, राजेंद्र साखरे हे कारवाईत सहभागी झाले होते.
---
अन् दोघे पळाले दुचाकी रस्त्यावरच टाकून
कारवाईत सात हजार रुपयांचा महसूल गोळा झाला. काही विक्रेत्यांचे तराजू व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ऐतिहासिक वेशीजवळील पुलावरून जाताना पथकाची कारवाई पाहून दोघे जण दुचाकी रस्त्यातच टाकून नदीत पळाले. वृद्धेश्वर चौकातही पथक पाहून फळे व भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
--
२६ तिसगाव कारवाई